नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, जम्मू आणि काश्मीरमध्ये अंदाजे ८२ कोटी रुपये खर्चून ३९५-मीटर (२-लेन) मारोग बोगद्याला संलग्न असलेल्या २५०-मीटर मार्गिकेचे (२-लेन) बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, या रस्त्याचे बांधकाम हे राष्ट्रीय महामार्ग NH-44 वरील रामबन ते बनिहाल या विभागाच्या बाजूने झाले आहे. मोठ्या प्रकल्पाचा एक भाग असलेल्या या ६४५ मीटर रस्त्याच्या बांधकामामुळे केवळ प्रवासातील अंतर २०० मीटरने कमी होणार नाही, यामुळे खडकाळ चढउताराचे अडथळे कमी होतील, शिवाय सुप्रसिद्ध सीता राम पासी या घसरणीच्या क्षेत्राला बायपास पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. याशिवाय, या सुविधेमुळे आव्हानात्मक चढण असलेल्या मार्गो भागातील वाहनांना बायपास पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्याने त्यांचा प्रवास सुलभ होणार आहे.
गडकरी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये असाधारण अशा महामार्ग पायाभूत सुविधा पोहोचवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे पालन करत आहोत. ते म्हणाले की, हा परिवर्तनकारी विकास केवळ या प्रदेशाच्या आर्थिक विकासात योगदान देणार नाही तर एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून त्याचे महत्त्व अधिक वाढवणार आहे.