नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुतळा नुतणी करण्याच्या नावाखाली मैत्रीणीनेच शहरातील एका महिलेस ५० हजार रूपयाला गंडा घातला. यवतमाळ येथील मैत्रीणीने ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशा उर्फ काजल रमेश गवई (रा.वणी जि.यवतमाळ) असे मैत्रीणीस गंडा घालणा-या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरी धर्मेश वाघजी (रा.विठ्ठल मंदिरामागे,कॉलेजरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गवई व वाघजी या दोन्ही महिला मैत्रीणी असून त्यांचे एकमेकांकडे जाणे येणे होते. १५ एप्रिल २०२२ रोजी गवई ही महिला शहरात आली होती. गंगापूररोडवरील बळवंतनगर भागात दोघींची भेट झाली.
यावेळी संशयित महिलेने पुतळा नुतणीकरणाचे काम हाती घेतल्याची माहिती देत वाघजी यांच्या कडून वर्गणी स्वरूपात ५० हजार रूपये स्विकारले. मात्र वर्ष – दीड वर्ष उलटूनही पुतळयाचे नुतनीकरण केले नाही. त्यामुळे वाघजी यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला असता संशयित महिलेने व्हिडीओ पोस्ट करीत दमदाटी केली. त्यामुळे माधुरी वाघजी यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार झाडे करीत आहेत.