नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते व माजी मंत्री यांना जामीन मिळाल्यानंतर ते कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रॅली काढली. आता ही रॅली केदारसह त्यांच्या समर्थकांच्या चांगलीच अंगलट आली आहे. पोलिसांची मनाई असतानाही रॅली काढून वाहतूक व्यवस्थेला अडथळा आणल्याप्रकरणी सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
न्यायालयाने केदार यांना काही अटी आणि शर्तीवर जामीन दिला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. त्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील दीडशे कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी २२ डिसेंबर रोजी न्यायालयाने केदार यांच्यासह सहा जणांना शिक्षा सुनावली होती. त्यानंतर ते तुरुंगात होते. परंतु उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारागृहपासून संविधान चौकापर्यंत केदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. पोलिसांची त्यासाठी परवानगी घेतली नव्हती.
विशेष म्हणजे सुटकेच्या एक दिवस आधीच केदार यांच्या कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याची सूचना पोलिसांनी दिली होती. तरीही गर्दी करून घोषणाबाजी करण्यात आली. केदार यांची जामिनावर सुटका होताच ते कारच्या सनरूफमधून बाहेर निघून कार्यकर्त्यांना कारागृहासमोरच अभिवादन करत होते. त्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी कार थांबून त्यांना हार घातले. त्यामुळे त्यांच्यावर सुध्दा कारवाई झाली आहे.