जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेचे निकाल जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामगिरीत मागील वर्षापेक्षा यावर्षी सुधारणा झाली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण निकालात जिल्ह्यातील १४ नगरपालिकांना ओडीएफ प्लस प्लस Open Defecation Free (ODF) चा दर्जा मिळाला आहे. ओडीएफ म्हणजे ही शहरे उघड्यावरील शौचालयापासून मुक्त आहेत. ओडीएफ प्लस म्हणजे ही शहरे फक्त उघड्यावरील शौचालयापासून मुक्त नसून या शहरात स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृह पण आहेत. ओडीएफ प्लस प्लस म्हणजे या शहरांमध्ये FSTP- एफएसटीपी (फेकल स्लज ट्रीटमेंट प्लांट) मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित आहेत.याठिकाणी सांडपाण्यावर नियमित प्रक्रिया केली जाते.
जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा, सावदा, यावल, पारोळा, रावेर व वरणगाव या नगरपालिकांना ओडईएफ प्लस प्लसचा दर्जा मिळाला आहे. अशी माहिती सहायक आयुक्त (नगरपालिका) जनार्दन पवार यांनी दिली आहे.
“स्वच्छता सर्वेक्षण कामगिरीत सुधारणा झाली आहे. पुढील वर्षी नगरपालिकांच्या कामगिरीत अजून सुधारणा होण्यासाठी निकालाचे नगरपालिकानिहाय विश्लेषण केले जाईल. यानुसार सखोल नियोजन आराखडा तयार करून आवश्यक निधी व मनुष्यबळ प्रत्येक नगरपालिकेला उपलब्ध करून दिले जाईल.एक वर्ष प्रचंड मेहनत घेऊन पुढील वर्षी चांगला निकाल लागेल,यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.” अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.
नगरपालिकांमध्ये पायभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.नागरिकांनी ही स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नगरपालिकांमध्ये झालेल्या सुधारणांसाठी नागरिक, सफाई कामगार व मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन ही त्यांनी केले आहे.