नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस पक्षाने अयोध्या येथे राम मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. या सोहळ्यात गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती. सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. पण, ते जाणार नसल्याचे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश यांनी पत्रक काढून स्पष्ट केले आहे.
या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, प्रभू रामाची आपल्या देशात लाखो लोक पूजा करतात. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. पण आरएसएस, भाजपने अयोध्येतील मंदिराचा राजकीय प्रोजेक्ट बनवला आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांनी निवडणुकीच्या फायद्यासाठी पुढे आणले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या २०१९ च्या निकालाचे पालन करताना आणि प्रभू रामाला पूजणाऱ्या लाखो लोकांच्या भावनांचा आदर करताना, मल्लिकार्जुन खर्गे, श्रीमती. सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्टपणे आरएसएस, भाजप कार्यक्रमाचे निमंत्रण आदरपूर्वक नाकारले आहे असे या पत्रकात म्हटले आहे.