नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा, गटप्रवर्तक १२ तारखेला नाशिक येथे पंतप्रधानांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कृती समितीने दिली.
केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत अंगणवाडी कर्मचारी व आशा, गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ केलेली नाही. अंगणवाडी कर्मचारी आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, महागाई निर्देशांकाला जोडलेली मानधन वाढ, मासिक पेन्शन, ग्रॅच्युइटी, भाडेवाढ, आहाराच्या दरात वाढ या महत्त्वाच्या मागण्यांसाठी गेल्या ३७ दिवसांपासून संपावर आहेत. सरकारने अजूनही ठोस निर्णय घेऊन संपावर तोडगा काढलेला नाही. आशांना दिलेले मानधन वाढीचे आश्वासन राज्य सरकारने पाळलेले नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तक १२ जानेवारी पासून बेमुदत संपावर जात आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व योजना कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य शासनाने सन्माननीय तोडगा काढावा व आशा, गटप्रवर्तकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून मानधनवाढीचा जीआर काढावा या महत्त्वाच्या मागण्या घेऊन अंगणवाडी कर्मचारी व आशा, गटप्रवर्तक १२ जानेवारी रोजी नाशिक येथे मोठ्या संख्येने जमतील व पंतप्रधानांना भेटून निवेदन देतील. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती प्रमुख समन्वयक डॉ. डी. एल. कराड, एम ए पाटील, शुभा शमीम, राजु देसले, भगवानराव देशमुख, आनंदी अवघडे, पुष्पा पाटील दिलीप उटाणे, कमल परुळेकर, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली.