इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई पोलिसांच्या पाठोपाठ नाशिकच्या पोलीसांनी शनिवारी शिंदे गावात ड्रग्ज माफियाला लक्ष करत एका गोडाऊनवर छापा टाकला. या छाप्यात कोटयवधींचे ड्रग्ज सापडले. दोन दिवसात झालेल्या या छाप्यामुळे नेमकी अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आली नव्हती. त्यामुळे वेगवेगळे आकडेही प्रसिद्द होत होते. पण, आज शिंदे गावात झालेल्या कारवाईची माहिती समोर आली आहे.
या कारवाईबाबत पत्रकार परिषद घेत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी छाप्याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या कारवाईत ४८७० किलोग्रॅम वजनाचा ५ कोटी ८४ लाख ४० हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. त्यात पिवळसर रंगाचा पावडर स्वरूपाचा असलेला एमडी नावाचा अमली पदार्थ व १२ हजार रुपये प्रति ग्रॅम वजनाचा पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिळून आला. त्याचप्रमाणे या गोडाऊनमधून एमडी तयार करण्याचे केमिकल व इतर साधनसामुग्री जप्त करण्यात आली.
या कारवाईबाबत माहिती देतांना त्यांनी सांगितले की, शिंदेगाव परिसरातील दत्तू वामन जाधव यांनी पोलिसांना माहिती दिली की संजय काळे या व्यक्तीला शेतीसाठी लागणारी औषधे कच्चामाल ठेवण्यासाठी दरमहा पाच हजार रुपये प्रमाणे भाडे तत्वावर जागा दिली होती. परंतु, सध्या तो गाळा बंद असून याबाबत शंका आहे. ही माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत हड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, सुवर्णा हंडोरे आदींनी शिंदे गाव या गोडाऊनवर छापा टाकला.
अशी सुरु झाली कारवाई
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी नाशिकमध्ये एम. डी. ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केल्यानंतर शनिवारी नाशिक रोड पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला आहे. या ड्रग्जची किंमतही ५ कोटीच्या आसपास आहे. शिंदे गावातच ही दुसरी कारवाई केल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या दोन कारवाईमुळे नाशिक ड्रग्जच्या विळख्यात सापडला तर नाही ना? असा सवालही उपस्थितीत केला जात आहे.
ललित पाटीलमुळे सुरु झाला ड्रग्ज रॅकेटचा शोध
शुक्रवारी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ जणांना अटक करुन ३०० कोटीचे दीडशे किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईत झिशान इक्बाल शेख या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ही दुसरी कारवाई झाली. फक्त शुक्रवारी मुंबईच्या पोलिसांनी केली होती तर शनिवारी नाशिकच्या पोलिसांनी केली. ड्रॅग्स रॅकेट चालवणारा ड्रॅग माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्यानंतर पोलिसांनी या ड्रग्ज रॅकेटचा शोध सुरु केला आहे. त्यात मुंबई पोलिसांच्या हाती शुक्रवारी हा कारखाना लागला तर शनिवारी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली.