मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात खळबळउडवून देणाऱ्या सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज ऐतिहासिक निकाल दिला. या निकालात शिंदे गटाला दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची यावर अगोदर निकाल देत त्यात शिंदे गट हीच खरी शिवसेना असा निकाल दिला. यावेळी त्यांनी भरत गोगावलेंचा व्हिप हा वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर गोगावले यांच्या ठाकरे गटाच्या विरोधात असलेल्या याचिकेचा निकाल देतांना मात्र ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवले.
हा निकाल देतांना नार्वेकर म्हणाले की, दोन्ही गटांकडून घटना मागितली गेली. पण, दोन्ही गटांनी ती दिली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना मान्य करण्यात आली. २०१८ साली केलेली घटना ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे १९९९ साली केलेली घटना मान्य केल्याचेही त्यांनी निकाल देतांना सांगितले. त्यानंतर त्यांनी हा निकाल दिला.
शिवसेनेत दोन गट पडले हे २२ जून रोजी लक्षात आले. खरी शिवसेना ठरवण्याचे अधिकार माझेच असेही ते म्हणाले. अपात्रतेचा निर्णय देण्या अगोदर शिवसेना कोणाची याचा निकाल त्यांनी दिला. यावेळी दोन्ही घटनांचे विश्लेषण करण्यात आले. त्यांनी राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय़ अंतिम आहे. पक्षप्रमुखांचे मत अंतिम हे मान्य करता येणार नाही असे सांगितले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचा युक्तीवाद मान्य करता येणार नाही असेही सांगितले.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एकूण ३४ याचिकांचा सहा गटात समावेश करून ही सुनावणी पार पडल्यानंतर हा निकाल देण्यात आला. सुमारे २०० पानांचा एक निकाल सहा गटांचा मिळून सुमारे बाराशे पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. सहा गटांतील निकालांचा केवळ सारांश आज वाचण्यात आला.