मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात खळबळउडवून देणाऱ्या सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हा निकाल मान्य नाही असे सांगत यापुढे कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निकाला विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
हा निकाल आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून शिवसेना भवन बाहेर नार्वेकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात शिंदे गटाला दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची यावर अगोदर निकाल देत त्यात शिंदे गट हीच खरी शिवसेना असा निकाल दिला. यावेळी त्यांनी भरत गोगावलेंचा व्हिप हा वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे.