इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स गुजरातच्या हरित ऊर्जा क्षेत्रात पुढील १० वर्षे गुंतवणूक करत राहणार आहे. रिलायन्स २०३० पर्यंत गुजरातच्या जवळपास निम्म्या ग्रीन एनर्जीचे उत्पादन करेल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ मध्ये ही घोषणा केली.
हरित विकासामध्ये गुजरातचा जागतिक नेता म्हणून उदयास येण्यासाठी, रिलायन्सने जामनगरमध्ये ५००० एकरच्या धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले आहे. अंबानी म्हणाले, यामुळे मोठ्या प्रमाणात हरित नोकऱ्या निर्माण होतील आणि हरित उत्पादने आणि सामग्रीचे उत्पादन शक्य होईल ज्यामुळे गुजरात हरित उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार बनेल.
गुजरातला आपली मातृभूमी आणि कार्यस्थळ असल्याचे सांगताना मुकेश अंबानी म्हणाले की, गेल्या १० वर्षांत रिलायन्सने देशात सुमारे १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये झाली आहे. ७ कोटी गुजरातींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रिलायन्स कोणतीही कसर सोडणार नाही.