नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी १२ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी कांदा प्रश्नावरील काही महत्वाच्या मुद्यांवर पंतप्रधानांची समक्ष भेट व्हावी, त्यासाठी शिष्टमंडळाला वेळ द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. त्यासाठी मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांना पत्र दिले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
केंद्रात कोणतेही सरकार असले तरी कांदा दरात वाढ झाल्यानंतर निर्यात बंदी सारखे निर्णय घेऊन दर नियंत्रित ठेवत असते. या निर्णयामुळे ग्राहकांचे हित जपले जाते. मात्र, कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. कांदा उत्पादक शेतकरी हा प्रामुख्याने कोरडवाहू शेती करतो व कांदा हे त्याचे एकमेव नगदी पीक आहे. या पिकाच्या किमतीवर सातत्याने नियंत्रण ठेवल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून येत नाही. यामुळे सरकारच्या धोरणामुळे सातत्याने होत असलेले कांदा उत्पादकांचे नुकसान, कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आदी बाबी थेट पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांच्याशी थेट बोलावे असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत असल्याने या भेटीच्या वेळेची मागणी केली असल्याचे दिघोळे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत या देशातील अनेक जटील प्रश्न सहजपणे सोडवले आहेत. कांदा प्रश्न त्या तुलनेत सोपा आहे. यामुळे या चर्चेतून पंतप्रधान मोदी निश्चितपणे या प्रश्नावर तोडगा काढतील, असा विश्वास वाटतो. असे दिलेल्या पत्रात म्हटले असल्याचेही दिघोळे यांनी सांगितले.