बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २५ जानेवारीला हा लिलाव होणार आहे. या कारखान्यावर २०३ कोटी ६९लाख लाख रुपये थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी युनियन बँकेने ही प्रक्रिया सुरु केली आहे. जीएसटीच्या थकीत बाकीमुळे अगोदरच हा कारखाना चर्चेत होता. त्यानंतर आता युनियन बँकेने कारवाईचे हत्यार उचरल्यामुळे हा कारखाना पुन्हा चर्चेत आला आहे.
काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यास १९ कोटी रुपये थकबाकीसाठी नोटीस बजावली होती. हा थकित कर भरण्यासाठी लोकसहभागातून १९ कोटी रुपये देण्याची तयारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी केली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी अशा लोकवर्गणीस विरोध केला होता. या कारखान्यावर छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बँकेच्या उस्मानपुरा शाखेचे वीस एप्रिल २०२१ पासून २०३ कोटी ६९ लाख रुपयांच्या कर्जाची थकबाकी, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी ही प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, श्रीनिवास दीक्षितुल्लू, ज्ञानोबा मुंडे, फुलचंद कराड, गणपतराव बनसोडे, जमनाबाई लाहोटी, केशव माळी, किसनराव शिंगारे, महादेवराव मुंडे, नामदेव आघाव, पांडुरंगराव फड, पंकजा मुंडे, परमेश्वर फड, प्रतापराव आपेट, आर. टी. देशमुख, शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, विवेक मोरे, व्यंकटराव कराड, यशश्री मुंडे यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे सर्व संचालक, कर्जदार आणि जामीनदार आहेत.
परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ मुंडे यांनी उभा केला होता. सध्या पंकजा मुंडे या अध्यक्ष आहेत. गेल्या काही वर्षात कारखान्यावर अनेक बँकांचे कर्ज झाले. युनियन बँकेने कारखान्याचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे. आता या प्रक्रियेला स्थगिती मिळते की पुढे काय होते हे बघणे महत्त्वाचे आहे.