मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिट अँड रन कायद्या विरोधात पुन्हा मनमाड येथील टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी माल वाहतुकदारांनी तीन दिवसाचा संप पुकारला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर तो मागे घेण्यात आला. पण, आज अचानक या टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे मनमाड येथून तीन्ही ऑइल कंपनीतून सकाळी एकही टँकर आज भरला गेला नाही.
मात्र काल रात्री पासून अचानक पुन्हा टँकर चालकांनी आपला संप सुरू केल्याने तीनही ऑइल कंपनी मधून आज सकाळ पासून एकही टँकर इंधन भरून बाहेर पडला नाही. टँकर चालक ऑइल कंपनीकडे फिरकलेच नसल्याने सर्व टँकर पार्किंग परिसरात उभे आहे. तर या अघोषित संपाची जबादारी कुठल्याही वाहतूकदार संघटनेने घेतलेली नाही. पण, अचानक संप पुकारल्यामुळे इंधन पुरवठा ठप्प होण्याची शक्यता असून ऑइल कंपनी व जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. वाहन चालकांचे स्टेरिंग छोडो आंदोलनामुळे पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२ जानेवारीला संप घेतला होता मागे
काही दिवासापूर्नी केलेल्या संपात हिट अँड रन कायदाच्या अटी जाचक असल्याने या कायद्यात बदल करावा अशी मालवाहतूकदार संघटनांची मागणी होती. मालवाहतुकदार संघटनेच्या संपला पाठिंबा देण्यासाठी मनमाड जवळच्या पानेवाडी टर्मिनल येथील टँकर चालक सहभागी झाल्याने उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा,नगर जिल्ह्यात इंधन पुरवठा ठप्प झाला होता. २ जानेवारीला नाशिक जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या उपस्थितीत पानेवाडी टर्मिनल येथे वाहनचालक, मालक यांची बैठक होऊन वाहनचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत इंधन भरण्यास सुरुवात केली होती.