इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आज दिल्लीत चर्चा झाली. यात बहुजन वंचित आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी यांच्यासाठी सुध्दा एक जागा सोडली जाणार आहे.शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, काँग्रेस या चार पक्षांमध्ये ४८ जागांचे वाटप करण्याचे निश्चीत झाले आहे.
या चर्चेत आकडा समोर आला नसला तरी शिवसेनेने जरी २३ जागांची मागणी केली असली, तरी पक्षात पडलेली फूट लक्षात घेऊन तिला १७ ते १९ जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जरी १८ जागांची मागणी केली असली, त्या पक्षाला १३ ते १५ जागा सोडल्या जातील. गेल्या वेळी लोकसभेची एक जागा जिंकलेल्या काँग्रेसच्या वाट्याला १२ ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि डाव्या आघाडीला दिली जाण्याची शक्यता आहे.
दिल्लीत झालेल्या या बैठकीची माहित ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी दिली ते म्हणाले काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीची बैठक झाली. जागावाटपाबाबत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. वंचित बहुजन आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली असून आघाडीत घेण्यात सर्वांचे एकमत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, सर्व जागांवर चर्चा झाली आणि सर्व काही सकारात्मक आहे. बैठक अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाली. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.