इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बेंगळुरू येथील एका एआय कंपनीच्या सीईओ महिलेने चार वर्षाच्या आपल्या मुलाचा गोव्यातील एका हॉटेलमध्ये निर्दयपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन ही महिला टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने जात असताना तिला चित्रदुर्ग येथे पोलिसांनी अटक केली. महिलेला पुढील चौकशीसाठी गोव्यात आणण्यात आले आहे.
सुचना सेठ (३९) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला शनिवारी गोव्यातील सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये आपल्या चार वर्षीय मुलासह चेक इन केले. पण सोमवारी तिने हॉटेलमधून एकटीनेच चेकआऊट केले. तिच्या हातात बॅग होती. पण तिचा मुलगा नव्हता. तिने हॉटेलच्या रिसेप्शनला टॅक्सी बुक करण्यास सांगितले. टॅक्सी भाडे महाग पडेल त्यामुळे विमानाने प्रवास करण्याची महिलेला विनंती केली असता तिने टॅक्सीच बुक करण्याचा आग्रह रिसेप्शनकडे धरला. त्यानंतर ही महिला टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने रवाना झाली.
दरम्यान, महिला राहिलेल्या रुममध्ये रक्ताचे डाग सापडल्याने या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु झाली. त्यानंतर ही महिला पोलिसांच्या ताब्यात सापडली. सुचना सेठचा २०१० मध्ये वेंकट रमनशी विवाह झाला होता. नऊ वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. पण एका वर्षानंतर २०२० मध्ये या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या कस्टडीसाठी दोघांनीही कोर्टात धाव घेतली होती. मात्र, त्यापूर्वीच तिने मुलाची हत्या केली.









