नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका तसेच उत्तरपत्रिकांच्या फुटीप्रकरणी सीबीआय अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई, सूरत, अमरेली, नवसारी आणि बक्सर इत्यादी शहरांमध्ये जवळपास १२ ठिकाणी छापे घातले आणि डिजिटल पुरावे तसेच बेकायदेशीर कागदपत्रे ताब्यात घेतली.
पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भर्ती केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका तसेच उत्तरपत्रिका बाहेर फुटल्या असल्याच्या आरोपांवरून पश्चिम रेल्वेने काही रेल्वे अधिकारी तसेच मुंबईतील एका खासगी कंपनीचे अधिकारी यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. जीडीसीई कोट्यातील बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीतील (बिगर पदवीधर) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखक आणि ट्रेन कारकून या पदांसाठी ३ जानेवारी रोजी संगणकाधारित परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई, अहमदाबाद, इंदोर, राजकोट, सूरत आणि बडोदा या 6 शहरांमधील २८ परीक्षा केंद्रांवर एकूण ८,६०३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यावेळी, व्हॉट्सअप च्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात आली तर काही विद्यार्थ्यांच्या जमावाला प्रश्नपत्रिका थेट दाखवण्यात आली असा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसेच परीक्षा आयोजन संस्था म्हणून उपरोल्लेखित खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली असा देखील आरोप करण्यात आला आहे.
जीडीसी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु होण्यापूर्वी पैसे घेऊन प्रश्नपत्रिका आणि त्यातील प्रश्नांची उत्तरे पुरवण्यात आली असा देखील आरोप करण्यात आला आहे. तसेच परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांनी या विद्यार्थ्यांना अनोळखी व्हॉट्सअप लिंकच्या माध्यमातून या परीक्षेचे निकाल देखील पुरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.