नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय दंड संहिता २०२३ बाबत गैरसमज पसरून काही चालकांकडून काम बंदची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे. वास्तविक ऑल इंडिया ट्रान्सपोर्टशी चर्चेनंतर भारतीय न्याय संहिता २०२३ लागू करण्यात येणार याबाबत शासनाने आश्वासन दिले आहे. त्यामुळे चालकांमध्ये हा कायदा लागू करण्याबाबतचा गैरसमज अथवा अफवा पसरवू नये असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केले आहे.
अध्यक्ष राजेंद्र फड यांनी म्हटले आहे की, भारतीय न्याय सहिंता २०२३ लागू करण्याबाबत ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट संघटनेने संप पुकारल्या नंतर शासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर ऑल इंडिया ट्रान्सपोर्टशी चर्चेनंतर भारतीय न्याय संहिता २०२३ लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. मात्र काही लोकांकडून अफवा पसरविले जात असल्याने चालकांनी विरोधी भूमिका घेत काही ठिकाणी काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे. त्यामुळे कुणीही चालकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवू नये असे आवाहन राजेंद्र फड यांनी संघटनेच्या वतीने केले आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले हे आवाहन
ट्रक चालकांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारने दखल घेतली असून चालकांनी तत्काळ कामावर रुजू होत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता कलम 106 (2) अन्वये 10 वर्षे तुरुंगवास आणि दंडबाबतच्या तरतुदीबाबत ट्रकचालकांच्या चिंतेची दखल घेतली आहे. याबाबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली आहे.
नवे कायदे आणि तरतुदी अद्याप अंमलात आलेल्या नाहीत हे सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. भारतीय न्याय संहिता कलम 106 (2) लागू करण्याचा निर्णय ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व ट्रक चालकांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे