इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बनावट दस्तऐवज तयार करून प्लॅाट विक्री करणा-या तीन जणांना न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर अनेकांचा धाबे दणाणले आहे. गेल्या काही दिवसात असे बनावट दस्तऐवज करुन दुस-यांची मालमत्ता आपल्या नावावर करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. पण, न्ययालयाच्या एका निकालाने आता या गुन्हेगारांना जरब बसणार आहे.
दोन दिवसापूर्वी गंगापुर शिवारात प्लॉट मालकाच्या संमती शिवाय, परस्पर बनावट दस्तऐवज तयार करून विक्री करणा-या तीन जणांना न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुकदेव होणाजी दळवी, विनायक मधुकरराव गायकवाड व संदिप रमेश चौधरी ही शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात १२ वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या फसवणूकीची फिर्याद विश्वास मधुकर मालेगांवकर, (वय ५५ वर्षे, रा. साईमंगल अपार्टमेंट, २१६, महात्मानगर, नाशिक) यांनी २४ जानेवारी २०११ ला तक्रार दिली होती. त्यानंतर गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मालेगांवकर यांचे नावे असलेला गंगापुर शिवारातील प्लॉटचा आरोपीने बनावट पॅनकार्ड तयार करुन दुय्यम निबंधक सो, वर्ग-२ यांचे कार्यालयाची दिशाभुल करुन त्याचा परस्पर बनावट दस्तऐवज तयार करून विक्री केला होता.
हा निकाल आल्यानंतर नाशिकमधील फेक गँगचे धाबे दणाणले आहे. या बनावट प्रकरणात अनेक जण गुंतले आहे. काही जणांचे व्यवहार समोर येतात तर काहींमध्ये तडजोड केली जाते. तर काही जण भीतीपोटी तक्रारच करत नसल्याची चर्चा आहे.