मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय हवाई दल, महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने, भारतीय हवाई दलाच्या जनसंपर्क कार्यक्रमा अंतर्गत मुंबईत १२ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत दुपारी १२ ते १ या वेळेत मरीन ड्राइव्हवर हवाई कसरतींचे आयोजन करणार आहे.
प्रामुख्याने जागरूकता निर्माण करणे आणि भारतीय हवाई दल तसेच स्थानिक समुदाय यांच्यात सखोल संबंध वाढवणे हा या जनसंपर्क कार्यक्रमाचा उद्देश आहे. चित्तवेधक कसरती आणि प्रात्यक्षिके, भारतीय हवाई दलाचे कौशल्य, क्षमता आणि व्यावसायिकतेचे दर्शन घडवतील.
या कार्यक्रमात सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिक पथक (एस. के. ए. टी.) आणि ‘सारंग’ हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाद्वारे हवाई प्रात्यक्षिकांचा समावेश असेल. फ्लायपास्ट आणि सुखोई-30 एमकेआय. द्वारे कमी उंचीवरील हवाई कसरती, ‘आकाशगंगा’ पथक आणि सी-130 विमानाद्वारे फ्रीफॉल आणि पॅराशूट प्रात्यक्षिकांसह विविध प्रकारच्या हवाई कसरतींचा समावेश असेल.