इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आज दिल्लीत चर्चा होणार आहे. बहुजन वंचित आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा निर्णय अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे सूचित केले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, काँग्रेस आणि वचिंत आघाडी या चार पक्षांमध्ये ४८ जागांचे वाटप करण्यासाठी दोन फॉर्म्युले तयार करण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या पदरात जागावाटपात सर्वाधिक २० जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस लोकसभेच्या १८ ते २० जागांवर निवडणूक लढवू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वाट्याला सहा ते आठ जागा मिळण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेने जरी २३ जागांची मागणी केली असली, तरी पक्षात पडलेली फूट लक्षात घेऊन तिला १७ ते १९ जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जरी १८ जागांची मागणी केली असली, त्या पक्षाला १३ ते १५ जागा सोडल्या जातील. गेल्या वेळी लोकसभेची एक जागा जिंकलेल्या काँग्रेसच्या वाट्याला १२ ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि डाव्या आघाडीला दिली जाण्याची शक्यता आहे.