इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सदोष सरकारी नोकर भरतीच्या विरोधात गेले अनेक वर्षे विविध विद्यार्थी संघटनांसोबत आम आदमी पार्टी महाराष्ट्र संविधानिक मार्गाने काम करत असून, भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात राज्य शासनाच्या संबंधित खात्यांशी व मंत्र्यांशी तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशी गेले २ वर्षांपासून अनेकदा पुराव्यासह पत्रव्यवहार करत आहोत. सरकार या देशद्रोही घोटाळ्याबाबत काहीही कारवाई केली नाही म्हणून सदोष नोकरभरती बाबत दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी आम आदमी पार्टी व स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एकत्रित रित्या मुंबई उच्च न्यायालयात “विशेष जनहित याचिका (PIL ) दाखल केली असून उद्या दिनांक १० जानेवारी, २०२४ रोजी मुंबईत याबाबत सुनावणी होणार आहे*
सरकारी नोकर भरतीबाबत आम आदमी पार्टीच्या मागण्या पुढील प्रमाणे:.
१. ४,६४४ तलाठी पदांसाठी दि.१७ ऑगस्ट २०२३ ते ¬१४ सप्टेंबर २०२३ दरम्यान झालेल्या तलाठी भरतीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. वरील पुराव्यांच्या अनुषंगाने हि परीक्षा ताबडतोब रद्द करून पुढील ४५ दिवसांत “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पुन्हा नव्याने परीक्षा घ्याव्यात.
२. यापुढील सर्व सरकारी नोकर भरती परीक्षा “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घ्याव्यात.
३. आजपर्यंत झालेल्या पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांची मा. मुंबई उच्चं न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष समिती नेमून ३० दिवसांत या समितीने आपला अहवाल सादर करावा व दोषींवर कठोर कारवाई करावी.
४. नोकरभरतीत भ्रष्टाचार व पेपरफुटी टाळण्यासाठी या महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून अत्यंत कठोर कायदे तयार करावेत.
५. सर्व सरकारी नोकरभरती परीक्षांचे शुल्क रु. १०० इतके करावे.
तलाठी भरती पेपरफुटी २०२३
४,६४४ तलाठी पदांसाठी दि.१७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान एकूण ५७ शिफ्ट मध्ये TCS ION कंपनीमार्फत पेपर घेण्यात आले होते. तलाठी परीक्षेसाठी १०,०४१,७१३ उमेदवारांनी अर्ज केले त्यापैकी ८,६४,९६० उमेदवार परीक्षेस हजार होते. तलाठी परीक्षेत अनेक गैरप्रकार झाले ते पुढीलप्रमाणे :
अ) नाशिक पेपरफुटी : पिंपरी-चिंचवड पोलीस भरती-२०२१, म्हाडा पदभरती-२०२२ मधील आरोपी गणेश गुसिंगे याने तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फोडला. आरोपींकडे प्रश्न पत्रिकेचे १८६ फोटो आढळून आल्याचे FIR मध्ये नमूद आहे स्पाय कॅमेरा, मायक्रो ब्लूटूथ सारखी अत्याधुनिक उपकरणे वापरून हा पेपर फोडण्यात आला.
ब) श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर : येथे एक उमेदवार परीक्षेदरम्यान पुस्तकात कॉपी करून पेपर सोडविताना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्याअर्थी त्याने पुस्तक परीक्षा केंद्राच्या आत नेले त्याअर्थी तलाठी परीक्षा केंद्रांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कुचकामी होती.
क) वर्धा : तानिया कॉम्प्युटर लॅब – येथील परीक्षा केंद्रातील कर्मचारी परीक्षे दरम्यान लॅपटॉप बराच वेळ केंद्राबाहेर घेऊन गेला आणि नंतर परत केंद्राच्या आत आला. बाहेर गेल्यानंतर त्याने पेपर फोडला नसेल, कोणाला प्रश्न पुरविले नसतील किंवा इतर गैरप्रकार केले नसतील का? केंद्रात आत आल्यानंतर ड्राईव्ह डाऊनलोड करण्यास गेलो होतो असे मोघम उत्तर त्याने दिले. यामुळे परीक्षेच्या पार दर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
ड) अमरावती आणि सांगली FIR : अमरावती येथील माधव इन्फोटेक नावाच्या परीक्षा केंद्रांवर पेपर फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हाय-टेक उपकरणांसह एका उमेदवाराला अटक करण्यात आली. सांगलीत मिरज रत्यावरील परीक्षा केंद्रात, परीक्षेआधीच हाय-टेक उपकरणांसहीत अटक करण्यात आली.
इ) TCS ION परीक्षा केंद्र संभाजीनगर : परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षक उमेदवारांना रफ शीट द्वारे उत्तरे पुरविताना सापडला, त्याला मदत करणारी सफाई कामगार महिला आणि इतर कर्मचारी सुध्दा यावेळी अटक करण्यात आले. परीक्षेदरम्यान कच्या कामासाठी दिले जाणाऱ्या रफ शीटवर उत्तरे उमेदवारापर्यंत पोचविण्यात येत होत्या. परीक्षेतील प्रश्न बाहेरील स्थळावरून पाठविले जात होते तर त्याची उत्तरे शोधून उमेदवारांना रफ शीटद्वारे पुरविण्यात आली. यातील आरोपी पोलिसांना अनायसेच सापडला, गाडी चोरीच्या आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांनी जेव्हा आरोपीचे मोबाईल चेक केले तेव्हा त्यांना यातील काही गोष्टी आढळून आल्या.
यापैकी नाशिक येथील FIR ची सर्टिफाइड कॉपी सोबत दिलेली असून पोलिसांतर्फे अजूनपर्यंत चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही. तर संभाजीनगर येथील पेपरफुटी FIR ची आणि चार्जशीटची सर्टिफाइड कॉपी सोबत दिलेली आहे. संभाजी नगर येथील चार्जशीट मध्ये नमूद केल्याप्रमाणे “नागपूर” येथील परीक्षा केंद्रावरून तलाठीचा पेपर (प्रश्न) फोडून संभाजीनगर येथील पर्यवेक्षकाला पाठविण्यात आले होते. पण हा पेपर अजून कोणा कोणाला पाठविण्यात आला होता याबाबत चार्जशीट मध्ये काहीही सांगण्यात आलेलं नाही. जर अशाप्रकारे अनेक परीक्षा केंद्रावर पेपर गेला असेल तर? अनेक परीक्षा मॅनेज झाले असल्यास लाखो उमेदवारांवर अन्याय होईल त्यामुळे याचा न्यायालयीन SIT मार्फत तपास झाल्यानंतरच सत्य बाहेर येऊ शकेल.