इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वयाचा वारंवार उल्लेख करून त्यांना निवृत्तीचा सल्ला देणारे अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्तीचा सल्ला देतील का, असा प्रश्न करत आ. रोहित पवार यांनी त्यांना थेट काकालाच आव्हान दिले आहे.
रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्याची भाषा करणाऱ्या अजित पवार यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातून बाहेर जावे, अशी म्हणायची हिंमत आहे का? कधी ते मला बच्चा म्हणतात तर कधी ते शरद पवार यांचे वय काढतात; मात्र ते मोदी यांच्या वयावर कधी बोलत नाहीत. मोदी ऐंशी वर्षांचे होतील, तेव्हा त्यांना राजकारणातून जाण्याचा सल्ला देण्याची हिमंत अजितदादांत आहे का? असा घणाघात केला.
यावेळी ते म्हणाले की, ‘ईडी’ने नोटीस पाठवणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवणे या सर्व कारवाया युवा संघर्ष यात्रेत सरकार विरोधी भूमिका घेतल्यामुळे झाल्याचेही त्यांनी सांगितले. अशी कारवाई करण्यामागे जवळचे लोक पण असतात; पण राजकारण म्हटले, की एक रेष ओढावी लागते. ती आम्ही ओढली आहे, असे ते म्हणाले.
तलाठी भरतीप्रकरणात आ. पवार यांनी केलेल्या आरोपावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला होता. त्याबाबत आ. रोहित पवार यांनी, विखे पाटलांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दोनशेपैकी २१४ गुण देऊन कुणालाही डॉक्टर करणार का? असा प्रतिप्रश्न केला.