पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवकाळी पावसामुळे अगोदरच शेतक-यांचे मोठे नुकसान झालेले असतांना हे संकट काही कमी होत नाही. आता पुन्हा हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तास राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा अंदाजामुळे पुन्हा शेतक-यांची चिंता वाढली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दक्षिण महाराष्ट्र वगळता राज्यात आज पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कोकणासह उत्तर महाराष्ट्रात सोमवारी काही ठिकाणी पाऊस पडल्याने तापमानात घट झालेली आहे.
राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण राहील अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. कोकणातही रिमझिम पाऊस पडेल. नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ चा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर भारतात थंडीचा कहर सुरूच आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रातील नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार नाही. पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. पूर्व उत्तर प्रदेशात धुके पडण्याची शक्यता आहे. काही भागात ठिकाणी दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.