नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आर्थिक देवाण – घेवाणीतून एका इसमास डोक्यात हत्याराने घाव घालून ठार केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे घडली. सुरुवातीस दुचाकी अपघाताचा बनाव करणाऱ्या दोघा संशयितांनी पोलिसी खाक्या दाखवताच खून केल्याची कबुली दिली.
आठ तासांच्या आत पोलिसांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. या घटनेत साकोरा येथील दिपक कदम या इसमास तमाशाला जायचे आहे असे सांगून एका निर्जन स्थळी बोलवण्यात आले. त्यानंतर त्याच्या डोक्यात हत्याराने घाव घालत त्याचा खून करण्यात आला.
दरम्यान, खून झाल्यानंतर संशयितांनी मयताची दुचाकी व मयतास रस्त्यावर आणून टाकत अपघाताचा बनाव केला. मात्र पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत हा अपघात नसून खून असल्याचा उलगडा केला. या खून प्रकरणी दत्तु उर्फ योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.