इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जयपूरः राजस्थानमध्ये मुख्यमंत्री भजनलाल शर्मा पहिल्या परीक्षेत नापास झाले आहेत. करणपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंह कुन्नर यांनी भाजपचे उमेदवार आणि मंत्री सुरेंद्र सिंह टीटी यांचा १२ हजार ५७० मतांनी पराभव केला आहे.
करणपूरच्या जागेवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने आमदार होण्यापूर्वी सुरेंद्र सिंह यांना मंत्री करून भजनलाल शर्मा मंत्रिमंडळात समाविष्ट केले होते. काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंह यांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर सहानुभूतीचा फायदा मिळाला. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांचा पराभव झाला. श्री गंगानगरच्या करणपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गुरमीत कुन्नर यांच्या निधनानंतर या जागेवरील निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने करणपूर जागेसाठी पाच जानेवारीला मतदान घेतले. काँग्रेसने गुरमीत कुन्नर यांचा मुलगा रुपिंदर सिंह कुन्नर यांना उमेदवारी दिली, तर भाजपने त्यांचे पूर्वीचे उमेदवार सुरेंद्र सिंह टीटी यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले. सुरेंद्र सिंह टीटी यांना राज्यमंत्री केले. निवडणुकीत पक्षाला राजकीय लाभ मिळावा, असा भाजपचा हेतू होता. सुरेंद्र सिंह यांना मंत्री करण्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘एक्स’ वर लिहिले होते, की करणपूरमध्ये ५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी आचारसंहिता लागू असूनही तेथून भाजपच्या उमेदवाराला मंत्री बनवणे हे आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. तेथील मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, असे गेहलोत म्हणाले होते.