नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राबाबत १० डिसेंबर २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. मतदान यंत्र पूर्णत: सुरक्षित असून त्याबाबत समाज माध्यमांवर पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
मतदान यंत्र जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये दोन मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राबाबत प्रात्याक्षिक व प्रचाराद्वारे जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात ईव्हीएम प्रात्याक्षिक केंद्र उभारण्यात आले आहे, असे ही शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
या प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून मतदान यंत्राबाबत माहिती देवून नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येते. मतदान यंत्र हे पूर्णत: सुरक्षित असून ते हॅक करता येत नाही, त्यावर नोंदविलेले मतदान हे अचूक होत असून त्यात कोणताही फेरफार करता येत नाही. तसेच या यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात असून याद्वारे मतदाराने नोंदविलेले मत अचुक नोंदविले गेले असल्याचे त्यास लगेच खात्री करून देण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी मतदान यंत्र जनजागृती मोहिमेत स्वत: मतदान यंत्राावर मतदान करून मतदान अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.