इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातच नाही, तर परदेशातही होणार आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवरही याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध देशांतील भारतीय दूतावासांमध्येही श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा प्रसारित केला जाणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम भक्तांना संबोधित करणार आहेत.
सूत्रांनी सांगितले, की मोदी समारंभाच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी विधी आणि नियमांबद्दल तपशीलवार माहिती मागितली आहे. रामलल्लाच्या अभिषेकसाठी ८४ सेकंदांचा शुभ काळ निश्चित करण्यात आला आहे. ही वेळ २२ जानेवारी रोजी दुपारी १२.२९ ते साडेबारा पर्यंत असेल. मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजला वीस फूट उंच आहे. यात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे आहेत.
रामललाची मूर्ती कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. ही मूर्ती पाच वर्षांच्या मुलाच्या रूपात आहे. त्याचबरोबर लहान मंदिरात सध्या स्थापित असलेली जुनी मूर्तीही नवीन मूर्तीसह गाभाऱ्यात स्थापित करण्यात येणार आहे.