इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मालदीव सरकारने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ‘सोशल मीडिया’वर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तीन मंत्र्यांना निलंबित केले. मरियम शिउना, मलशा शरीफ आणि महजूम मजीद अशी निलंबित करण्यात आलेल्या मंत्र्यांची नावे आहेत. ‘सोशल मीडिया’वर सुरू झालेल्या वादामुळे भारतातील लोकांनी मालदीववर जोरदार टीका तर केलीच; पण त्यांचे दौरेही रद्द केले आहेत. त्याच वेळी, मालदीव सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे, की शेजारी देश भारताचा अपमान करणाऱ्या ‘सोशल मीडिया’वरील काही पोस्ट्सबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारत सरकारच्या भूमिकेवर एक निवेदन जारी केले. सरकारी पदावर असताना ‘सोशल मीडिया’वर अशा पोस्ट टाकणाऱ्यांना आता निलंबित करण्यात आले आहे.
मरियम शिउना मालदीव सरकारमध्ये युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला मंत्रालयात उपमंत्री होत्या. शिउना या माले सिटी कौन्सिलच्या प्रवक्त्यादेखील आहेत. त्यांनी एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. वाद वाढल्याने ती हटवण्यात आली. महजूम मजीद हे मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला मंत्रालयात उपमंत्री होते. त्यांची आवड कायदा क्षेत्रात आहे. आंतरराष्ट्रीय इस्लामिक विद्यापीठ मलेशिया येथे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. २०२२ मध्ये त्यांनी मालदीवची पहिली बार परीक्षा उत्तीर्ण केली. वादविवादांमध्येही ते भाग घेतात. मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी ‘युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला मंत्रालया’मध्ये मलशा शरीफ यांना उपमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती; मात्र वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी भारताशी संबंधच बिघडवले नाहीत, तर त्यांचे मंत्रीपदही गमावले.
मोदी यांनी दोन आणि तीन जानेवारीला लक्षद्वीपमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. या वेळी त्यांनी लक्षद्वीपमधील स्नॉर्कलिंगचा आनंद लुटला. त्यांनी त्यांच्या भेटीची छायाचित्रे ‘सोशल मीडिया’वर शेअर केली. त्यानंतर काही लोकांनी मालदीवला पयार्य म्हणून लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी एक पाऊल म्हणून पाहिले. भारतातील पर्यटकांनी मालदीवऐवजी लक्षद्वीपला जाण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर मालदीव बेटावरील देशातूनही ‘सोशल मीडिया’वर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. या वेळी मालदीवच्या काही नेत्यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली.