इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर – ‘शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर निघायचे असेल तर त्यांनी दूध उत्पादनावर भर दिला पाहिजे. येत्या काळात दुधाची मागणी वाढणार असल्याने यादृष्टीने शेतकऱ्यांचे प्रबोधन आणि प्रशिक्षणही तेवढेच आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे ‘अॅग्रोव्हिजन’च्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, खासदार अशोक नेते, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार आशिष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, डॉ. सी.डी. मायी, रमेश मानकर, रवी बोरटकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. दाभा येथील पीडीकेव्ही ग्राऊंडवर २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी विदर्भाच्या हिताचे विषय लक्षात घेऊन त्यासंदर्भातील तांत्रिक ज्ञान आणि व्हिजन शेतकऱ्यांना कसे देता येईल, याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ना. श्री. गडकरी म्हणाले. ते म्हणाले, ‘मदर डेअरीने बुटीबोरीमध्ये जागा घेतली आणि साडेचारशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. त्यामुळे भविष्यात विदर्भातूनच दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गरज पडली तर विदर्भाच्या बाहेरून दूध मागविण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने दुग्धोत्पादनावर मोठी कार्यशाळा यंदाच्या अॅग्रोव्हिजनमध्ये होणार आहे. यात मदर डेअरीचा देखील सक्रीय सहभाग असणार आहे.’
विदर्भात दुग्धोत्पादनाचा प्रयोग यशस्वी करायचा असेल तर शेतकऱ्याला पशुखाद्य स्वस्तात मिळणे आवश्यक आहे. त्याला कमी पैशांत खाद्य मिळाले तर दुधाचे उत्पादन वाढविण्यास मदत होईल. ज्या शेतकऱ्यांना दूध उत्पादनात पुढे यायचे आहे, त्यांनी त्याचा सविस्तर अभ्यास करण्याचीही गरज आहे. येत्या काळात शेतकऱ्यांना दुधाचा भाव जास्त मिळवून देणे, हिरवा चारा वर्षभर उपलब्ध राहणे, पशुखाद्याचा भाव कमी असणे आणि विदर्भात २० ते २५ लिटर दूध देणाऱ्या गायींची संख्या वाढणे या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
सिंचन आणि नर्सरी
विदर्भातील शेतीचे सिंचन आज २२ ते २५ टक्के आहे. ते ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील झिंग्यांचे उत्पादन, बांबू उत्पादन, मत्स्यपालन, उस लागवड आदी विषयांवर त्यांनी विचार मांडले. यासोबतच प्रत्येक गावात एक उत्तम रोपवाटिका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची रोपवाटिका होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.