रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्जतमध्ये 100 खाटांचे हॉस्पिटल लवकरच उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.कर्जत तालुक्यातील आमदार महेंद्र थोरवे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी खा. श्रीरंग बारणे, आ. महेंद्र थोरवे,आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. सदा सरवणकर आदी उपस्थित होते.
कर्जत शहरात उभारलेल्या प्रवेशद्वाराला महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन आणि उल्हास नदीकिनारी प्रति पंढरपूर – आळंदी करण्यात आली असून याठिकाणी विठ्ठलाची 52 फूट उंच मूर्तीचे लोकार्पण, दहिवली चौक येथे धर्मवीर संभाजी महाराज स्मारक, जिजामाता उद्यानातील शिवसृष्टीचे तसेच कर्जत शहरातील 14 कोटी रुपये खर्चाच्या प्रशासकीय भवनाचे लोकार्पण,भजनसम्राट गजाननबुवा पाटील सभागृहाचे भूमिपूजन तसेच 90 कोटी रुपये खर्चाच्या कर्जत – चौक काँक्रीट रस्ता, 140 कोटी खर्चाच्या खोपोली येथील मलनिःस्सारण प्रकल्प येथे भुयारी गटार,खालापूर येथे ग्रामीण रुग्णालयाचे माथेरान येथील 47 कोटी खर्चाच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे आणि माथेरान डोंगरातील किरवली ते जुम्मा पट्टी येथील बारा आदिवासी वाड्या यांना जोडणाऱ्या 18 कोटी खर्चाच्या ररस्त्याचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, हे शासन सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी कार्य करत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवक यांच्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून 2 कोटी 19 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अटल सेतूमुळे रायगड आणि मुंबई यातील अंतर कमी होणार आहे. कर्जतवासियांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून मुख्यमंत्री महोदयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 5 कोटी, कर्जत नळ पाणीपुरवठा योजनेस मान्यता तसेच पेण अर्बन बँक प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष देण्यात येईल असे सांगितले.