इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तलाठी भरती परीक्षा” हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. २०० पैकी २१४ गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करते आहे. आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विट करत हे निकालाची प्रत पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त १५ एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये ५४ मार्क आणि तलाठी मध्ये २०० पैकी २१४ मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. ९९ टक्के जागा विकल्या आहेत.
सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार. असे म्हटले आहे.
एकुणच तलाठी परिक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर त्यावर गेल्या दोन दिवसांपासून संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर सुरु आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असले तरी त्याचे गांभीर्य मात्र सत्ताधारी पक्षाने आतापर्यंत घेतले नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.