इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शाल्मली क्षत्रियची १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. शाल्मली क्षत्रिय उदयोन्मुख जलदगती गोलंदाज व सलामीवीर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे सूरत येथे आयोजित स्पर्धेसाठी शाल्मली १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. शाल्मली क्षत्रियने मागील २०२२ -२३ या हंगामात देखील १९ वर्षांखालील महिला संघाचे प्रतिनिधित्व केले होते. एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. उपान्त्यपूर्व सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत शाल्मली क्षत्रियने ११ चौकरांसह ८७ चेंडूत नाबाद ६८ धावांचे अतिशय महत्वपूर्ण योगदान देत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. गोलंदाजीत ही काटकसरीने ८ षटकांत ३ निर्धाव टाकत व केवळ १७ धावा देत १ गडी बाद केला होता व विजयी अष्टपैलू कामगिरी केली होती .
शाल्मलीची, मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली होती . एन सी ए अंतर्गत हि स्पर्धा २१ ते ३१ मे दरम्यान राजकोट येथे झाली . अष्टपैलु शाल्मली क्षत्रियची रांची येथील १७ एप्रिल ते ११ मे २०२३ दरम्यान झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील एन सी ए शिबिरात देखील निवड झाली होती .
यापूर्वीच्या हंगामात वेळोवेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेतील या खेळाडूंची सातत्यपूर्ण, लक्षणीय कामगिरी विचारात घेऊनच सदर निवड झाली आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे मुली व महिला क्रिकेटपटूंसाठी साठी सराव शिबीर वर्षभर सुरू असते. त्यात सर्व खेळाडूंना उत्तम मार्गदर्शनाचा लाभ होत असतो.
सूरत येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत : ८ ऑक्टोबर – तामिळनाडू , १० ऑक्टोबर – मणिपूर , १२ ऑक्टोबर – विदर्भ, १४ ऑक्टोबर – पुदुचेरी , १६ ऑक्टोबर – मेघालय .
या निवडीमुळे नाशिकच्या व खासकरून महिला क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, शाल्मलीच्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , पदाधिकारी , सदस्य व प्रशिक्षक यांनी खास अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.