इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नऊ जानेवारीला, सकाळी साडे नऊच्या सुमाराला, पंतप्रधान गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथे पोहोचणार असून, तिथे जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, त्यानंतर आघाडीच्या जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांसोबत त्यांची बैठक होईल. दुपारी तीनच्या सुमाराला, पंतप्रधानांच्या हस्ते, व्हायब्रंट गुजरात जागतिक ट्रेड शो चे उद्घाटन होईल.
१० जानेवारीला सकाळी पावणे दहाच्या सुमाराला, गांधीनगर इथल्या महात्मा मंदिरात पंतप्रधान व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद २०२४ चे उद्घाटन करतील. त्यानंतर, ते जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर, पंतप्रधान गिफ्ट सिटीला भेट देतील. तिथे सुमारे सव्वा पाच वाजता, जागतिक फीनटेक नेतृत्व मंचावर, ते आघाडीच्या उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधतील.
व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेची संकल्पना, २००३ साली, गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्रष्टया नेतृत्वाखाली विकसित करण्यात आली होती. आज व्यावसायिक सहकार्य, ज्ञानाचे आदानप्रदान आणि धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून, एकात्मिक वृद्धी व शाश्वत विकास साधण्यासाठीचे एक प्रतिष्ठित व्यासपीठ म्हणून ही परिषद नावारूपाला आली आहे. दहावी व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद, १० ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान गांधीनगर इथे होणार आहे. या परिषदेची संकल्पना “ भविष्याचे प्रवेशद्वार” अशी आहे. या वर्षीच्या शिखर परिषदेत ३४ भागीदार देश आणि १६ भागीदार संस्था सहभागी होणार आहेत. त्याशिवाय, ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालय, या मंचांचा वापर करून ईशान्य भारतात असलेल्या व्यावसायिक संधी दाखवणार आहे.
या शिखर परिषदेदरम्यान चर्चासत्रे आणि परिसंवादांसह जागतिक दृष्ट्या महत्वाच्या विविध विषयांवर कार्यक्रम होणार आहेत. यात चौथी औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, टिकावू उत्पादने, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहनव्यवस्था आणि शाश्वत ऊर्जा व शाश्वततेकडे वाटचाल अशा विषयांचा समावेश असेल.
व्हायब्रंट गुजरात जागतिक ट्रेड शो मध्ये, विविध कंपन्या त्यांची जागतिक दर्जाची उत्तम कला आणि तंत्रज्ञान असलेली उत्पादने प्रदर्शित करतील. ई-मोबिलिटी, स्टार्ट अप्स, एमएसएमई, नील अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा आणि स्मार्ट पायाभूत सुविधा अशा विषयांवर या ट्रेड शो मध्ये भर दिला जाईल.