नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसादम देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित, स्थानिक आणि पारंपरिक अन्न उपलब्ध करुन देईल. यामुळे सामान्य लोक आणि पर्यटक आरोग्यदायी आणि सुरक्षित खाद्य सवयीशी जोडले जातील “,असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशात उज्जैनच्या नीलकंठ वन, महाकाल लोक येथे देशातील पहिली आणि आरोग्यदायी खाऊ गल्ली ‘प्रसादम’ चे त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
“विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील नागरिकांनी निरोगी असणे आवश्यक आहे”, असे डॉ. मांडवीय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीची पुष्टी करत सांगितले. त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले,” आरोग्यविषयक पायाभूत सुविधांव्यतिरिक्त आरोग्यदायी अन्न, नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे. देशभरातील नागरिकांना आरोग्यदायी खाद्यपदार्थ खायला मिळावेत या दृष्टीने आगामी काळात प्रत्येक शहरात स्वतःची खाऊ गल्ली असेल”. या निरोगी आणि आरोग्यदायी खाऊ गल्ली उपक्रमासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अधिकृत संकेतस्थळही यावेळी सुरू केले. तसेच त्यांनी निरोगी आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी, खाऊ गल्ल्यांना बंधनकारक असणारी प्रमाणित कार्यपद्धती स्पष्ट करणाऱ्या माहितीपत्रकाचे देखील अनावरण केले.
अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी यासह सभोवतालच्या परिसरात पायाभूत सुविधा आणि इतर सोयीसुविधा विकसित केल्याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कौतुक केले. डॉ. मांडवीय यांनी, ‘ईट राईट मिलेट’ म्हणजेच योग्य भरडधान्य खाण्याचा प्रसार करणाऱ्या मेळाव्यातील गजबजलेल्या ठेल्यांना भेट दिली आणि तेथील प्रशिक्षित आचाऱ्यांशी संवादही साधला.
भेसळ रोखण्याच्या दृष्टीने ग्राहकांना सक्षम करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ‘द डार्ट बुक’ ही माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. या पुस्तिकेत, आपल्या घरगुती दैनंदिन वापराच्या अन्नधान्यातील भेसळ तपासण्यासाठी साध्या सोप्या चाचण्या दिल्या आहेत. याव्यतिरिक्त, दुर्गम भागात जाऊन प्रशिक्षण आणि जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी, तसेच गावोगावी आणि शहरा शहरात फिरून जागरूकता मोहिमा राबवून भेसळ शोधणाऱ्या चाचण्या करण्यासाठी, फूड सेफ्टी ऑन व्हील्स (एफएसडब्ल्यू) या नावाने, जागच्या जागी भेसळ चाचणी करणाऱ्या अन्नसुरक्षा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
९३९ चौरस मीटर एवढे क्षेत्र व्यापलेल्या प्रसादम या खाऊ गल्लीत एकूण १९ दुकाने असून ही खाऊ गल्ली, महाकालेश्वर मंदिराला रोज भेट देणाऱ्या एक ते दीड लाख भाविकांना सोयीस्कर तसेच सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध अशा पौष्टीक भोजनाचे पर्याय उपलब्ध करून देते.