पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आता शरद पवार येथे आले, तर त्यांना मी वाकून नमस्कार करेन. ते एक बुजुर्ग नेते आहेत. राजकीय व्यासपीठावरची टीका वेगळी असते, असे स्पष्ट मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या राजकीय वक्तव्याची चर्चा होत आहे. दरम्यान, नाट्यसंमेलनातील या मुलाखतीत त्यांनी कलाकारांचे कान टोचले.
पिंपरीतील शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यात त्यांनी मिश्किल संवाद साधला. त्यांच्या खास ठाकरी शैलीत नाट्यक्षेत्रातील उणिवांवर बोट ठेवले. नाट्य क्षेत्रातील घडामोडी आणि बारकावे टिपताना त्यांची निरीक्षण शक्ती दिसून आली. नाट्यक्षेत्रासह सध्याच्या राजकीय घडामोडी, जातीपातीचे राजकारणावक राज यांनी या मुलाखतीत सडेतोड भूमिका मांडली. नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील मराठी कलाकार एकमेकांना टोपणनावाने, शॉर्टकट नावाने हाक मारतात, यावर नापसंती व्यक्त करताना त्यांनी जोपर्यंत कलाकार एकमेकांना मान देणार नाही, तोपर्यंत त्यांना वेगळी ओळख आणि आदर मिळणार नाही, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अशोक सराफ यांचे उदारहरण दिले त्यांना मी सर म्हणतो. पण, सगळे त्यांना मामा म्हणतात. इतक्या मोठ्या कलाकाराला सर म्हणून आपणच मान द्यायला हवे असे त्यांनी सांगितले.
एकमेकांना चारचौघात आपुलकी दाखवून टोपणनावाने हाका मारणे बंद करा, हे बजावून सांगताना राज यांनी आपुलकी घरात ठेवा. लोकांसमोर एकमेकांना मान द्या, असे सुचवले. दक्षिणेतील लोक नम्र बसतात. आपल्याकडे कुणीही येते आणि खांद्यावर हात ठेवते, हे चुकीचे आहे, असे राज म्हणाले. अरुण सरनाईक यांना कुणी आरू किंवा श्रीराम लागूंना शिरू हाक मारलेली मला आठवत नाही, असे सांगून त्यांनी आब राखण्याचा सल्ला दिला.