नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आपल्या पुढच्या पिढ्यांचा आवाज बुलंद व्हायला हवा असेल तर सगळ्यांनी मिळून परिवर्तन घडवायला हवे. स्वातंत्र्याने सर्वांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. आता सर्व स्तरावर समानता हवी आहे. पण ती मतांच्या फायद्यासाठी नव्हे तर मानवतेच्या पायावर व्हावी. व्होट बँक राजकारणामुळे इतिहास सोयीस्करपणे बदलला जातो. सत्य दडपले जाते. ते समोर आणण्याचे काम करतोय असे सांगून मनोरंजन क्षेत्र देखील राष्ट्रसेवेत योगदान देते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले.रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचा भव्य मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी काल ( दि.७) ते बोलत होते.
दोन दिवसीय परिषद व मेळावा शनिवार दि.६ व रविवार ७ जानेवारी रोजी ग्रेप काउंटी येथे आयोजित करण्यात आला. विवेक अग्निहोत्री यांनी कश्मीर फाईल्स चित्रपट , बुद्धा इन ए ट्राफिक जाम, त्यावर आधारित अर्बन नॅक्सल्स हे पुस्तक, वैक्सीन वॉर, ताश्कंद फाईल्स या आपल्या चित्रपटांचे संदर्भ देऊन त्यांनी उपस्थित रोटेरियन्सना स्वतःला योग्यवेळी ओळखून समाजिक परिवर्तन घडविण्यास सज्ज व्हावे. असे आवाहन केले.
‘आशाए… ए कार्निवल ऑफ होप ‘ या परिषद, मेळाव्याचे यशस्वी आयोजन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या गव्हर्नर आशा वेणूगोपाल व पदाधिकाऱ्यांनी शानदार आयोजन केले. १० वर्षांनंतर नाशिकमध्ये झालेल्या या भव्य मेळाव्यात १८०० पेक्षा जास्त रोटरी प्रतिनिधी सहभागी झाले. यावेळी झालेली परिषद सर्व रोटरी क्लबकरिता तसेच समाजासाठी व विविध प्रकल्प, उपक्रमांसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरली. दोन दिवसात मान्यवर वक्त्यांनी त्यांचे समृद्ध अनुभव सांगून समाजोपयोगी अभिनव कल्पना मांडल्या. पहिल्या दिवशी शनिवारी इस्कॉनचे मार्गदर्शक गौरांग दास प्रभुजी, मध्यप्रदेशातील सरपंच भक्ती शर्मा, मेजर जनरल संजयकुमार विद्यार्थी, निवृत्त आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश, भारती ठाकूर यांनी प्रेरक विचार व्यक्त करून सर्वांना सेवेचा मंत्र सांगितला.
या मेळावा व परिषदेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष जयंत खैरनार, राजीव शर्मा, डॉ.के.एस.राजन, किशोर केडिया, शब्बीर शाकीर, महेश मोकळकर, ऍड. शिशिर हिरे, ममता जायस्वाल, संजय अरोरा, आनंद झुनझुनवाला, आगामी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे, जयेश संघवी व सर्व रोटरी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. अंजली मेहता यांनी आभार मानले. रोटेरियन मंगेश व स्मिता अपशंकर यांनी सूत्रसंचालन केले.