इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार वरचढ असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही दादांचे महत्त्व सत्तेत अधिक असल्याचे वारंवार आढळत आहे. गेल्या काही दिवसांचा घटनाक्रम पाहता दादा सत्तेत आल्यापासून भाजपच्या शीर्ष नेतृत्वानेच दादांचे महत्त्व वाढवित त्यांना पॉवरफुल्ल केले आहे.
अजित पवार यांना बरोबर घेण्यास राज्यातील भाजप नेत्यांचा विरोध होता पण दिल्लीतील नेत्यांनी त्यांना बरोबर घेऊन महत्त्वही दिले आहे. खातेवाटपात अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या वाट्याला चांगली खाती आली. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे समाधान करण्याकरिता भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांना चांगली खाती गमवावी लागली. विशेषत: शिंदे गटाचा ठाम विरोध असतानाही राष्ट्रवादीला महत्त्व देण्यात आले. यापाठोपाठ पालकमंत्र्यांच्या यादीतही पुणे, कोल्हापूर, गोंदिया, बीड, परभणी असे राष्ट्रवादीला हव्या असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाले आहे.
नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रीपदाचा राष्ट्रवादीचा हट्ट पूर्ण होतो का, हे कालांतराने स्पष्ट होईल. पण भाजप नेते व विशेषत: केंद्रीय गृहमंत्री अजित पवार यांना झुकते माप देतात हे अनुभवास येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात तेवढा राजकीय लाभ होऊ शकत नाही, असा निष्कर्ष भाजपचा आहे. यामुळेच अजित पवारांवर भाजपची मदार असावी. अजित पवारांमुळे बारामतीसह पुणे जिल्ह्यातील चार, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील दोन, नाशिक, नगरमध्ये काही प्रमाणात फायदा होईल, असे भाजपचे गणित असावे. भाजपसाठी लोकसभेच्या जागा महत्त्वाच्या आहेत. यामुळेच भाजपने अजित पवार यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची चर्चा आहे.
असे आहे भाजपचे गणित
भाजपला २०१४ आणि २०१९ या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्यातून ४० पेक्षा अधिक खासदारांचे पाठबळ लाभले. यंदाही ४० खासादारांचे संख्याबळ भाजपला अपेक्षित आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीसमोर भाजपला अपेक्षित खासदारांचे संख्याबळ मिळू शकत नाही हे भाजपने केलेल्या विविध सर्वेक्षणात आढळले होते. त्यामुळेच अजित पवार व त्यांच्याबरोबरील नेतेमंडळींमुळे फायदा होईल, असे भाजपचे गणित दिसून येत आहे.