सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हिंदू जन आक्रोश मोर्चावर झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून १२ ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या वेळी काही दुकानांची तोडफोड झाली.
कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी ‘एमआयएम’चे शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केली. आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग यांच्या उपस्थितीत ‘वक्फ बोर्ड कायदा’ रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी मधला मारुती परिसरात काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. या वेळी झालेल्या दगडफेकीत काही लोक जखमी झाले. पोलिसांनी सतीश शिंदे आणि शेखर स्वामी या दोघांना अटक केली आहे.
या मोर्चाच्या अगोदर आ. राणे आणि आ. सिंग या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. या दोघांनी आक्षेपर्ह वक्तव्य केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘वक्फ कायदा’ हा केवळ आपल्या देशात आहे. देशात रेल्वे आणि सैन्यापेक्षाही ‘वक्फ बोर्डा’कडे जमीन आहे, असे राणे म्हणाले.