कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय रुग्णालयात मोठमोठ्या शस्त्रक्रियेची सुविधा व प्रत्यारोपण व्यवस्था नाही. गोरगरिबांसाठी राज्यातील २७ पैकी महत्त्वाच्या ५ ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात येत्या तीन ते चार महिन्यात लिव्हर व किडनी प्रत्यारोपण सुविधा सुरू करणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अत्याळ, कोल्हापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी सांगितले.
नांदेडसारख्या दुर्दैवी घटना राज्यात पुन्हा होऊ नयेत म्हणून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासह त्या सुसज्ज करण्याचे कार्य शासनाने हाती घेतले आहे. शासकीय रुग्णालयांवर नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त ताण असतो. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाबरोबरच जर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अधिक बळकट केली तर मुख्यालयात असलेल्या जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल. यातून गरजूंना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.