नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन बहिण भावाशी लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाजी सुरेश साळवे (३४ मुळ रा.जिंतूर परभणी हल्ली रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ,दिंडोरीरोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना बजरंगवाडी भागात घडली होती. पीडित बहिण भावाच्या आईने याबाबत फिर्याद दिली होती. पीडित कुटुंबिय बजरंगवाडी भागात वास्तव्यास असून आरोपी त्यांचा परिचीत आहे. जानेवारी २०२२ ते १४ एप्रिल २०२२ दरम्यान हा प्रकार घडला होता. मुलांची आई कामानिमित्त घराबाहेर पडली की आरोपी त्यांच्या घरी जावून दहा वर्षीय मुलीस आणि आठ वर्षीय तिच्या भावास जवळ बोलावून घेत अनैसर्गिक अत्याचार करायचा ही बाब मुलांनी आपल्या आईकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला होता.
याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास उपनिरीक्षक सी.एम.श्रीवंत यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१० च्या न्या. व्ही. एस. मलकलपट्टे – रेड्डी यांच्या समोर चालला. सरकार तर्फे सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये आरोपीस पाच वर्ष सश्रम कारावास व बारा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.