नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात असून वेगवेगळय़ा भागात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे सात लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एकाच दिवसी दोन भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर, मुंबईनाका व अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार अशोकामार्ग भागात राहणारे अरूण लक्ष्मण कपिले (रा.प्रल्हाद आर्केड,कल्पतरूनगर ) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. कपिले कुटूंबिय शुक्रवारी (दि.५) दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख २३ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोडे करीत आहेत. दुसरी घटना राजीवनगर येथे घडली. रमेश नारायण येवले (रा.स्नेह बंगला,बोरा हॉस्पिटल शेजारी) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. येवले कुटुंबिय ३० डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील तिजोरीत ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ७२ हजाराचा ऐवज चोरून नेला.
तिसरी घटना याच भागातील वडाळा पाथर्डी मार्गावरील आयटीआय कॉलनी भागात घडली. मिलींद प्रभाकर कुसमोडे (रा.विश्वास सोसा.आयटीआय कॉलनी समोर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुसमोडे कुटुंबिय शुक्रवारी (दि.५) काही कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७६ हजाराचा ऐवज चोरून नेला. दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी व जमादार साळी करीत आहेत.
चौथी घटना जुने सिडको भागात घडली. भुषण भगवान भामरे (रा.शनि मंदिरापाठीमागे,शिवाजी चौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भामरे कुटूंबिय गेल्या मंगळवारी (दि.२) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली सुमारे दीड लाखाची रोकड चोरून नेली. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.