नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विसेमळा चौक भागात भरधाव दुचाकीने धडक दिल्याने ७२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. गुरूनाथ शंकर केळकर (रा.बालाजी विहार,अशोकस्तंभ) असे दुचाकी अपघातातील मृत वृध्दाचे नाव आहे. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळकर गेल्या १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास विसे मळा भागातून अशोकस्तंभाच्या दिशेने पायी येत असतांना हा अपघात झाला होता. भूमी ईकझोटीका या इमारतीसमोर भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली होती.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या केळकर यांचा मृत्यू झाला असून याबाबत हवालदार फुलाजी बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुरवाडे करीत आहेत.