नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महामार्गावरील पार्क साईड भागात राहत्या इमारतीच्या गॅलरीतून उडी घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय हरलाल भावसार (५३ रा.ए विंग,पार्क साईड) असे मृत इसमाचे नाव आहे. भावसार यांनी शुक्रवारी (दि.५) सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या गॅलरीतून जमिनीवर उडी घेतली होती.
या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने १०८ अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असता डॉ. शुभम बेंद्र यांनी मृत घोषीत केले. याबाबत गिरीश भावसार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
३२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खुटवडनगर परिसरातील डीजीपीनगर भागात राहणा-या ३२ वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कविता लक्ष्मण कोळी (रा.विशाल बंगलो,मयुर हॉस्पिटल मागे) असे मृत महिलेचे नाव आहे. कोळी यांनी शुक्रवारी (दि.५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती लक्ष्मण कोळी यांनी त्यांना तात्काळ उमा हॉस्पिटल मार्फेत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत.