इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी गेलेलं आदित्य एल 1 हे अंतराळ यान आज नियोजित कक्षेत पोहोचले आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख दशलक्ष किलोमीटर अंतरावर ही कक्षा आहे. या कक्षेत ५ वर्ष हे यान फिरण्याची शक्यता आहे. सुर्यग्रहणाच्या काळातही या कक्षेतून आदित्य एल-1 ला सूर्याचा अभ्यास करता येईल. गेल्यावर्षी २ सप्टेंबरला या यानानं श्रीहरीकोटामधून उड्डाण केले होते.
चांद्रयान-3 च्या यशानंतर ही मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO ने इतिहास रचला आहे. इस्रोने आदित्य यानाला यशस्वीरित्या सूर्याजवळच्या लॅग्रेज पॉइंट म्हणजे L1 च्या जवळपास हॅलो ऑर्बिटमध्ये स्थापित केले आहे.
इस्रोच्या पीएसएलवी-सी57 रॉकेटने २ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य-एल1 च यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. आदित्य एल 1 वेगवेगळ्या टप्प्यांमधून पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर गेलं. फक्त सूर्याचा अभ्यास आणि प्रत्येक छोट्यात छोट्या घडामोडीची माहिती देणं हाच ‘आदित्य एल1’ मिशनचा उद्देश आहे. सौर वातावरण, सूर्याची ऊर्जा, सूर्याचा पृष्ठभाग, सूर्यावर येणारे भूकंप हे उद्देश या मिशनमधून साध्य करण्यात येतील.
या य़शस्वी मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करतांना म्हटले की, भारताने आणखी एक लँण्डमार्क निर्माण केला आहे. भारतातील पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 गंतव्यस्थानावर पोहोचली. आमच्या शास्त्रज्ञांच्या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा साकारण्याच्या अथक समर्पणाचा हा पुरावा आहे. या विलक्षण पराक्रमाचे कौतुक करण्यात मी राष्ट्रासोबत सामील होतो. आम्ही मानवतेच्या हितासाठी विज्ञानाच्या नवीन सीमांचा पाठपुरावा करत राहू.