इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने आज रिगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहायक (लेखा) या पदांसाठीची परीक्षा सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील ७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. रिगमन (दोरखंडवाला) या पदासाठी १७ परीक्षार्थी पैकी ११ परीक्षार्थी उपस्थित होते तर ६ गैरहजर होते, वरिष्ठ सहायक (लेखा) पदाच्या परीक्षेसाठी ७६२ परीक्षार्थी पैकी ४४९ परीक्षार्थी उपस्थित होते तर ३१३ परीक्षार्थी गैरहजर होते. या गैरहजर माग नेमंक कारण काय आहे हे मात्र पुढे आले नाही.
ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पदभरतीतील ८ पदांसाठी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा ही घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज २ पदांसाठी परीक्षा ही पार पडली. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करून परीक्षा सुरळीत सुरू असल्याबाबतची माहिती घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांनी देखील सपकाळ नॉलेज हब येथील परीक्षा केंद्राला भेट दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सुचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी जिल्हा परिषद पद भरतीसाठी वॉर रूम तयार केला असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू होत असल्याबाबतची खात्री ही वॉर रूमच्या माध्यमातून करण्यात येत होती, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर वेन्यू ऑफिसरची नेमणूक करण्यात आली होती. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना काटेकोरपणे परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्याच्या सूचना या देण्यात आल्या होत्या. आज विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी १२८१ परीक्षार्थींनी ७ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.