मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून त्यावेळी नाशिकमध्ये त्यांचा रो शो होणार आहे. विभागीय क्रीडा संकुल हेलिपॅड ते मोदी मैदानावरील सभा स्थळापर्यंत हा रोड शो असणार आहे. तब्बल दीड किलोमीटरच्या या रोड शो मधून लोकसभेचे रणशिंग नाशिकमध्ये फुंकणार असल्याचे बोलले जात आहे.
आज या महोत्सवाच्या ‘शेकरू’ या शुभंकराचे, बोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून अनावरण करण्यात आले. त्यावेळेस या सर्व कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले नाशिकला होणा-या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पूर्ण तयार आहे. यात कुठलीही कमी राहणार नाही. तीन मंत्री यांनी तर तिथे मुक्काम ठोकला आहे. ते आता पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत मुंबईत परत येणार नाही. या तीन मंत्रीमध्ये गिरीश महाजन, दादा भुसे, संजय बनसोड यांचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम करण्याचे आपले प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ही संधी महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल धन्यवाद. १६ वर्षांनंतर महाराष्ट्राला ही संधी मिळाली. या महोत्सवासाठी २० समित्या गठीत करण्यात आल्या आहे. या कार्यक्रमाचा मोठा प्रचार, प्रसार झाला पाहिजे. हेलिपॅड ते सभा मैदान पर्यंत रोड शोचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी दीड ते दोन लाख लोक येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.