नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -अरबी समुद्रात लायबेरियाच्या एका मालवाहू जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न होत असताना, सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या यंत्रणेने तातडीने प्रतिसाद देत कारवाई सुरू केली आहे. संकटात असलेल्या या जहाजाने यूकेएमटीओ या पोर्टलवर एक संदेश पाठवला होता, ज्यामध्ये ४ जानेवारी च्या संध्याकाळी पाच ते सहा अज्ञात सशस्त्र कर्मचारी जहाजावर दाखल झाल्याचे सूचित करण्यात आले होते.
हा संदेश प्राप्त होताच भारतीय नौदलाने तातडीने त्याची दखल घेतली आणि त्याची पडताळणी करण्यासाठी सागरी टेहळणी विमान पाठवले. तसेच या जहाजाच्या मदतीसाठी आयएनएस चेन्नई या युद्धनौकेला त्या दिशेने रवाना केले. ५ जानेवारी च्या सकाळी टेहळणी विमानाने या मालवाहू जहाजाच्या वर उड्डाण करून, जहाजासोबत संपर्क प्रस्थापित करून त्यावरील कर्मचारी सुरक्षित असल्याची खातरजमा केली. नौदलाच्या विमानाने या जहाजावर देखरेख सुरूच ठेवली आहे आणि आयएनएस चेन्नई या जहाजाच्या जवळ मदतीसाठी जात आहे.
या सर्व परिस्थितीवर या भागातील इतर संस्था/एमएनएफच्या समन्वयाने अतिशय बारीक लक्ष ठेवले जात आहे. या भागातील व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदार आणि परदेशी मित्र देशांसोबत भारतीय नौदल वचनबद्ध आहे.