नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी संवाद साधतात. यंदाच्या “परीक्षा पे चर्चा २०२४ या कार्यक्रमाच्या ७ व्या आवृत्तीमध्ये सहभागी होण्यासाठी MyGov पोर्टलवर आजपर्यंत १ कोटींहून अधिक नोंदणी झाली आहे. यावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असलेला प्रचंड उत्साह दिसून येतो. या विशिष्ट कार्यक्रमात सहभागी होवून पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी देशातील विद्यार्थ्यी खूप उत्सुक असल्याचे दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या संवादात्मक ‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी) या कार्यक्रमामध्ये देशासह परदेशातुनही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी होतात. परीक्षेविषयीचे चिंतेचे वाटणारे विषय आणि शाळेनंतरच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये संवाद साधला जातो. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे गेल्या सहा वर्षांपासून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी, पीपीसी हा कार्यक्रम २९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नवी दिल्ली येथे, प्रगती मैदानात भारत मंडपम, आयटीपीओ, मध्ये ‘टाऊन-हॉल’ स्वरूपात होणार आहे. या कार्यक्रमात जवळपास ४००० सहभागी पंतप्रधानांशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक आणि कला उत्सव आणि वीर गाथा स्पर्धेतील विजेत्यांना मुख्य कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.
सहभागासाठी MyGov पोर्टलवर ऑनलाइन एमसीक्यू स्पर्धा ११ डिसेंबर २०२३ पासून १२ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित केली आहे. यामध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी चे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक स्पर्धेत थेट सहभागी होवू शकतात. आत्तापर्यंत म्हणजे, ५ जानेवारी २०२४ पर्यंत, ९० लाखांहून अधिक विद्यार्थी, ८ लाखांहून अधिक शिक्षक आणि सुमारे 2 लाख पालकांनी पीपीसीमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली आहे.
‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम, युवकांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एक्झाम वॉरियर या चळवळीचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करून असे तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे प्रत्येक मुलाचे अद्वितीय व्यक्तिमत्व जणू साजरे केले जाते, सर्वांना प्रोत्साहन दिले जाते आणि स्वतःला पूर्णपणे व्यक्त करण्याची परवानगीही असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात जास्त विकले जाणारे पुस्तक ‘एक्झाम वॉरियर्स’ या चळवळीला प्रेरणा देणारे आहे.
यंदा, युवा दिनी म्हणजेच १२ जानेवारी २०२४ पासून या पीपीसी कार्यक्रमाच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वी म्हणजे, दि. २३ जानेवारी २०२४ पर्यंत, शालेय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये मॅरेथॉन, संगीत स्पर्धा यासारख्या हसतखेळत शिक्षण देणाऱ्या शालेय कार्यक्रमांचा समावेश असेल. नकलांची स्पर्धा, नुक्कड नाटक, विद्यार्थी-अँकर-विद्यार्थी-अतिथी चर्चा असे कार्यक्रम होतील. शेवटच्या दिवशी, २३ जानेवारी २०२४, म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीदिनी देशभरातील ५०० जिल्ह्यांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाईल. या स्पर्धेसाठी चांद्रयान, भारताचे क्रीडा यश इत्यादी विषयांचा समावेश असेल. त्या विषयांमधून परीक्षा हा जीवनाचा उत्सव कसा असू शकतो हे दर्शविले जाणार आहे.
MyGov पोर्टलवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे सुमारे २०५० इच्छुक सहभागींची निवड केली जाईल. ज्यांची निवड होईल, त्यांना पंतप्रधानांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तक आणि प्रमाणपत्रासह ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी एक विशेष संच देण्यात येईल.