नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात चैनस्नॅचिंगच्या प्रकारात पुन्हा वाढ झाली असून गुरूवारी (दि.४) वेगवेगळय़ा ठिकाणी दोन चैनस्नॅचिंगच्या घटना घडल्या. या घटनेत दोन महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले असून याप्रकरणी भद्रकाली आणि आडगाव पोलिस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करणाात आले आहेत.
येवला येथील मिराबाई नंदकुमार बनकर (रा.अंगणगाव विंचूररोड,येवला) या बुधवारी (दि.३) नातेवाईकांच्या विवाह सोहळय़ा निमित्त शहरात आल्या होत्या. नांदूर जत्रा लिंकरोडवरील समृध्दी बॅक्वेट हॉल येथील विवाह सोहळा आटोपून त्या परतीच्या प्रवासासाठी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या आपल्या कारच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. लॉन्स समोरील रस्ता ओलांडत असतांना समोरून भरधाव आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ््यातील मंगळसुत्र ओरबाडून नेले. याबाबत भास्कर शिंदे (रा.नांदूरनाका) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुरंजे करीत आहेत.
दुसरी घटना वर्दळीच्या द्वारका भागात घडली. सुरेश शिवा नाईक (रा.जुनी हुबळी हंगेरी रोड जि.धारवड कर्नाटक) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. नाईक कुटूंबिय गुरूवारी देवदर्श नासाठी शहरात आले होते. दुपारच्या सुमारास नाईक आपल्या कुटूंबियासह द्वारका परिसरातून पायी जात असतांना ही घटना घडली. सर्कलवर सिग्नल ओलांडून ते विरूद्द दिशेने पायी जात असतांना भरधाव आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने नाईक यांच्या वृध्द आईच्या गळय़ातील सुमारे १ लाख ३५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.