नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका सेवानिवृत्त वृध्दास तब्बल ८ लाख ७५ हजार ४९४ रूपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केट मधील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून भामट्यांनी ही फसवणूक केली आहे. चार महिने उलटूनही परताव्यासह आयुष्याची पुंजी पदरी न पडल्याने सेवानिवृत्त वृध्दाने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल दत्तात्रेय बागुल (६७ रा. दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. बागुल जळगाव जिह्यातील पाटबंधारे विभागात सेवेत होते. गेल्या आठ नऊ वर्षापूर्वी ते शासकिय सेवेतून निवृत्त झाले आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात ते गुंतवणुकीसाठी ऑनलाईन योजनांचा माहिती घेत असतांना भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पियूष शर्मा, राघव शर्मा, विवेक जोशी व संजय कुमार नामक भामट्यांनी वेगवेगळया मोबाईल नंबरवरून संपर्क साधत शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखविल्याने बागुल भामट्यांच्या अमिषाला बळी पडले.
बागुल यांना १८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान वेगवेगळया बँक खात्यात तब्बल ८ लाख ७५ हजार ४९४ रूपयांची रक्कम भरण्यास भाग पाडले. संशयितांच्या सांगण्यानुसार बागुल यांनी वेगवेगळया बँकखात्यात ऑनलाईन रकमा वर्ग केल्या मात्र चार महिने उलटूनही कुठलाही परतावा न मिळाल्याने बागुल यांनी संशयितांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.